वाचन कट्टा

Saturday, September 12, 2015

सरकारी शाळांमधील समृद्धीची बेटं

- भाऊसाहेब चासकर

सरकारी आहे ते तद्दन फालतू, दर्जाहीन आणि जे खासगी ते गुणवान, असा समज आपल्या समाजानं करून घेतलाय. तो जवळपास रूढ झालाय. त्यात सरकारी शाळांचा तर विषयच काढूया नको, असं एकूण वातावरण आहे. कारण या शाळा म्हणजे पोरांचं वाट्टोळं होण्याची हमखास हमी! केवळ नाईलाज म्हणून तिकडं मुलांना पाठवायचं. जर का संधी उपलब्ध असेल तर ती साधावी. सरकारी शाळांबाबत अशा नकारात्मक आणि अविश्‍वासाच्या वातावरणाची निर्मितीकेली जात असताना खेड्या-पाड्यांतल्या या शाळांकडे चौकस आणि चिकित्सकपणे बघितलं तेव्हा असं दिसलं की, आज अनेक समृद्धीची बेटं फुललेली आहेत.
शिक्षणाच्या छानदार बागा फुलवणारे हे शिक्षकनामक माळी नेमके कोण आहेत? त्यांच्या या कामामागे कोणती प्रेरणा असते? याविषयी मनात खूप कुतूहल आणि उत्सुकता होती. काही ठिकाणी गेलो. फिरून सगळं पाहिलं. समजून घेतलं. शिक्षक, गावकर्‍यांशी, मुलांशी बोललो. तेव्हा असं दिसलं की, हे जे कोणी शिक्षक आहेत, त्यांचा कार्यसंस्कृतीवर गाढ विश्‍वास आहे. वेगळं काहीतरी करून दाखवण्याची अनिवार ऊर्मी आहे. झपाटलेपणातून आलेलं जाणतेपणही आहे त्यांच्या ठिकाणी. या सगळ्या गोष्टी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. बाह्य प्रेरणेपेक्षा अंतप्रेरणाच येथे जास्त महत्त्वाची असल्याचा प्रत्यय आला.
आजमितीस देशात साठ लाख, तर राज्यात सुमारे साडेचार लाख प्राथमिक शिक्षक आहेत. त्यातले वेगळं काही करून दाखविण्यासाठी झटणारे, प्रामाणिक धडपड करणारे कितीतरी शिक्षक आहेत. कोणत्याही क्षेत्रात अशी माणसं असतातच, की ज्यांच्या डोक्यात एक किडासतत वळवळत असतो. अमेरिकेतील मानसशास्राचे अभ्यासक डॉ. टेलर यांनी अभ्यासातून असं मत नोंदवलंय की, कुठेही वातावरण नीट असेल तर साधारण ९५ टक्के माणसं स्वत:चं काम चोखपणे करत राहतात. तीन टक्के कुंपणावर असतात आणि दोन टक्के चुकार किंवा गैरकृत्य करणारे असतात. प्रसिद्धी त्यांनाच जास्त मिळते. समाजाला तेच त्या त्या घटकाचे प्रतिनिधी असल्याचं वाटू लागतं. इथे गडबड आहे. सरकारी शाळेतले शिक्षक स्वत:ला समृद्ध करण्यासाठी भुकेलेले दिसताहेत. सरकारी प्रशिक्षणांतून अपेक्षाभंग होतो. वाळवंटातल्या झाडाची मुळं पाणी शोधतात, तसे शिक्षक स्वत:च वाटा शोधताहेत. काही जणांनी स्वयंसेवी संस्थांची, अभ्यासकांची, कार्यकर्त्यांची बोटं धरलीत. हे शिक्षक सुटीच्या दिवसांत स्वखर्चानं कार्यशाळांना जाताहेत. शिक्षणातले नवे प्रवाह समजून घेताहेत. चर्चा करताहेत. पुस्तके खरेदी करताहेत. नेटवरून माहिती घेताहेत. स्वत:चा लॅपटॉप मुलांच्या प्रभावी शिकण्यासाठी वापरताहेत. सगळी मुलं शिकू शकतात, यावर त्यांचा दृढ विश्‍वास आहे. म्हणून तर ते काही नव्या वाटा निर्माण करू शकलेत, करू पाहताहेत. यशाची चव त्यांना आणखी पुढे जायला ऊर्जा देते. अशा शिक्षकांचे जागोजाग काही गट तयार झाले. अजूनही होताहेत. निरनिराळे प्रयोग सुरू आहेत. चांगुलपणाचा संसर्गपसरतोय. विश्‍वास टाका. चित्र बदलेल, असंच त्यांना सांगायचं आहे.

शेवटी असे आहे की, प्रत्येक माणूस सुखी होण्यासाठी जगतो. हे सुख-समाधान भौतिक गोष्टींतून (गाडी, माडी, चंगळ यातून) मिळू शकत नाही, हे यांना उमगलेय. कामातून आनंद मिळतो. समाजात आपली उपयोगिता आहे. ती उपयोगिता सिद्ध करणे, ही बाब खूप सुखावणारी असते. अशी या शिक्षकांची भावना आहे, म्हणूनच हे सारे ते करीत जातात. हे सारे कोठून येते? याचे उत्तर यातच दडलेय. अर्थात, सारे आलबेल आहे, असे कोणालाच म्हणायचे नाहीये. उडदामाजी काळे गोरे..असं असणारच. पण हे समजूनन समजल्यासारखं करणारे लोकं सरकारी शाळांच्या नावाने गळे काढीत बसतात. अशी जमातच आपल्याकडे उदयाला आलीय. सरकारी शाळा पूर्णपणे बदनाम करून त्या बंद पडल्याशिवाय शिक्षणाचे खासगीकरण करणे शक्य नाही. यातूनच सरकारी शाळांची विश्‍वासार्हता घालवणं सुरू झालंय, हे येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवं.
आपल्या देशात औपचारिक शिक्षण सुरु झाल्यापासून गेल्या दोनशे वर्षांत येथे झालेल्या शिक्षणातील निरनिराळ्या प्रयोगांचे दस्ताऐवजीकरण करण्यात आपल्याला अपयश आले आहे. शिक्षण क्षेत्रात नव्या वाटा निर्माण होत असतात. उपक्रम सुरु असतात. पण हे काम समाजापार्यंत नीट पोचत नाही. त्यामुळे होते असे की, अपुऱ्या माहितीच्या किंवा समजूतीच्या आधारे जी काही टीका होते. ते वास्तव मानले जाते. समाज आपले मत त्यातूनच बनवत असतो. सरकारी शाळा आणि शिक्षकांच्या बाबतीत असेच झालेय हे म्हणायला मोठी जागा आहे.
येथे शिक्षकांची वकिली करण्याचा हेतू नाहीये. पण बऱ्याचदा शिक्षकांवर होणारी टीका-टिप्पणी पूर्णपणे एकतर्फी असते. पण त्यांना काही पेपरात लेख लिहिता येत नाहीत. मोठय़ा व्यासपीठांवर भाषणे करायला कोणी बोलावत नाही. त्यांना आवाजनाहीये. कोणताही प्रतिवाद न करता ही विखारी टीका निमुटपणे सोसत वाडी-वस्तीवर ते आपलं काम करीत राहतात. खेड्यापाड्यांतल्या शाळा कात टाकताहेत. त्यात शिक्षकांचे काहीच योगदान नाहीये की काय? कुठे शिक्षकाची बदली झाली तर निरोप देताना मुलांबाळासह गावकर्‍यांच्या नेत्रकडा पाणावतात. कोणी बदली रद्द करा म्हणून मोर्चा काढतात. अकोल्यातल्या पद्मावातीनगरसारख्या ५0-५५ पटाच्या वस्तीवरच्या अरुण जाधव या बदली झालेल्या शिक्षकाच्या खांद्यावर १00हून अधिक शाली टाकल्या जातात, हे काय आहे?


शाळाभेट

जिल्हा परिषदांच्या शाळांचा खेळखंडोबा झालाय, असं बोललं जात असतानाच साधना प्रकाशनानं नामदेव माळी यांचं शाळा भेटहे पुस्तक वाचकांच्या हातात दिलं. आपल्या पारख्या नजरेनं पाहिल्या, समजून घेतलेल्या राज्यातील उपक्रमशील शाळांचा परिचय माळी यांनी करून दिलाय. ते स्वत: शिक्षण खात्यात गटशिक्षण अधिकारी म्हणून काम करताहेत, त्यांनी असं लिहिण्याला वेगळं महत्त्व आहे. शाळा आहे शिक्षण नाहीहे नकारानं काठोकाठ भरलेलं पुस्तक काम करणार्‍या शिक्षकांना अस्वस्थ करून गेल्याचं त्यांनी पाहिलं. याची दुसरी बाजू प्रत्यक्ष काम करताना त्यांना अवतीभोवती दिसत होती! याच मनुष्यबळाकडून जर काम करून घ्यायचे आहे तर त्यांच्यावर तुटून पडण्यात काय पुरुषार्थ आहे? असा विचार माळी यांच्या मनात चमकून गेला. साधना साप्ताहिकात त्यांनी लेखमाला लिहिली. शिक्षण क्षेत्रातले अभ्यासक, कार्यकर्ते, तज्ज्ञ आणि मुख्य म्हणजे शिक्षकांनी याचं उत्स्फूर्त स्वागत केलं. आपल्या कामाची कोणीतरी नोंद घेतोय, हे शिक्षक सुखावणारं होतं. गावोगावी लेखांचं प्रकटवाचन झालं. राज्यभरातून शाळा भेटीची निमंत्रणं आली. त्यातून लेखन झालं. पुढे त्याचं पुस्तक झालं. मन लावून जीव ओतून काम करणार्‍या शिक्षकांच्या या शाळा आहेत. दस्तुरखुद्द माळी यांच्याच मते हा केवळ ट्रेलरआहे! पिक्चर बाकी आहे!!
या पुस्तकाच्या अवघ्या तीन महिन्यांत ४000 प्रती खपल्या. शिक्षण क्षेत्रानं पुस्तकाचं जोरदार स्वागत केलंय. जागोजाग त्यावर चर्चासत्र झाली आहेत. जणू इथे चांगलं काही घडतच नाही, असं जिथं चित्र रंगवलं जात होतं त्याला हे पुस्तक केवळ उत्तर नाहीये तर नीट पाहा शाळाही आहे आणि शिक्षणही आहे’, हेच दिसेल असंच हे पुस्तक सांगतंय. ते नवीन शिक्षकांना उपक्रमाच्या वाटा दाखवतं. शिक्षणातील नवे प्रवाह सांगतं. प्रेरणा, प्रोत्साहन देतं. त्यांचा कामावरचा विश्‍वास वाढवतं. सरकारी शाळांविषयीची टोकाची नकारात्मक चर्चा या पुस्तकानं सकारात्मक वळणावर आणून ठेवली आहे.

प्रकाशवाटा

सरकारी शाळा आणि अशा शाळांत शिकवणार्‍या शिक्षकांचं काय चित्र आज दिसतं? - अगदी उदाहरणांसह बोलायचे झाले तर पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामधल्या अत्यंत दुर्गम गावात प्रमोद धायगुडेसारखा शिक्षक स्वत:ला गाडून घेतो. तिथल्या समाज जीवनाशी एकरूप होतो. सगळ्या गावाला शाळेविषयी आपलेपणा वाटू लागतो. सगळं चित्र बदलून जातं. नंदुरबारवरून गेलेला वेच्या गावित हा तरुण रोज तीन तास गिरीकंदरातली रानवाट तुडवतो. अन् कर्जतमधल्या (रायगड) भेकरेवाडी या आदिवासी पाड्यावर औपचारिक शिक्षणाचा प्रकाश सोबत घेऊन जातो. थेट विदर्भातून आलेल्या योगेश राणे या शिक्षणसेवकाने अकोल्यातल्या (जि. नगर) बिताका या अत्यंत दुर्गम पाड्यावरच्या शाळेत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलीय. आदिवासींची पहिली पिढी तेथे क, , , घ.. गिरवतेय. बहिरवाडीसारखी हजारभर लोकवस्तीतली शाळा, शिक्षण मुलांच्या जीवनाशी जोडण्यासाठी धडपडतेय. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करतेय. राज्यातल्या अनेक शाळांत शिक्षकांच्या प्रयत्नातून, लोकवर्गणीतून संगणक शिक्षण सुरू झालेय. नगर जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना शिक्षकांनी संगणक मिळवलेत. त्याची किंमत काही कोटींच्या घरात आहे! शिरुरमध्ये ३६५ दिवस भरणारी सरकारी शाळा तर सकट गुरुजीच्या नावाने ओळखली जातेय! वैशाली गेडाम (छोटा नागपूर, चंद्रपूर) या तरुण शिक्षिकेनं मूल्यमापनाचा नवा पॅटर्न शोधलाय. जालना जिह्यातल्या अनिल सोनुने या संशोधक शिक्षकानं क्लासमेटनावाचा संगणक विकसित केलाय. मायक्रोसॉफ्टनं त्याच्या कामाची दाखल घेतलीय. तहसीलदारच्या नोकरीला धुडकावून इतिहासात रमणारा सदानंद कदम (सांगली), चौकटीत राहून सगळी तर्‍हेतर्‍हेची कामं सांभाळून चौकटीबाहेरचं काम करणारे फाक काझी (नाझरा, सांगोला), प्रल्हाद काटोले (ठाणे), बाळासाहेब कानडे (लौकी, ता. आंबेगाव, पुणे), अमित दुधवे (जळगाव), मीना गावंडे (यवतमाळ), मंगल पवार (कोपरगाव), लहू घोडेकर (परांडा, घोडेगाव, पुणे), कृष्णात पाटोळे, पूनम साळुंखे (पुणे), गोविंद पाटील (कोल्हापूर) ही यादी आणखीन वाढतच जाईल!!
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सातारा या लहानशा खेडेगावातल्या शाळेला तर आय.एस.ओ.मानांकन मिळालेय! कोणी म्हणेल आय.एस.ओ.गुणवत्ता मोजण्याचा निकष आहे काय? ते बरोबर. पण सध्या सरकारी शाळांची तुलना कॉर्पोरेट खासगी शाळांशी केली जातेय. म्हणून ही येथे नोंद घेणे भाग आहे. सातारा पंचायत समितीतल्या विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी शिक्षकांना विश्‍वासात घेऊन कुमठे विभागातल्या सर्व ४0 शाळांत तब्बल ६६ प्रकारचे उपक्रम राबवून निराळे काम उभे केलेय. कुठेही जा. नीट सकारात्मक दृष्टीनं पाहा, अशीच स्थिती दिसेल. ही यादी येथे देण्याचं कारण म्हणजे हे मोघम बोलणं नाहीये. कधी कोणीही या शाळांना भेट द्यावी. पाहणी करावी आणि हो, ही नावं प्रातिनिधिक नाहीत! तोकडी आहेत. माझ्या परिचयाची. लहान दुर्बिणीतून पाहिलेली ही बेटं आहेत. मोठय़ा दुर्बिणीतून पाहिल्यास मोठी जमीनच व्यापलेली दिसेल. नक्की!

प्रसारमाध्यमांत सरकारी शाळा !

आजवर माध्यमांमध्ये सरकारी शाळांबाबत केवळ नकारात्मक चर्चा होत राहिली. गेली काही वर्षे तर ती नको इतकी तिखट होती. काही जण हिंस्र श्‍वापदाप्रमाणे शिक्षकांवर तुटून पडायचे. शिक्षकांशी संबंधित नकारात्मक बातम्यांना मोठी प्रसिद्धी दिली जात होती. आता चित्र पालटतेय. वाडी-वस्तीवरच्या प्रयोगांविषयी माध्यमे बोलू लागली. लिहू लागली. अनुभवसारख्या मान्यवर नियतकालिकात अलीकडेच वस्तीवरच्या साळंसाठीअशी मुखपृष्ठ कथा प्रसिद्ध झाली होती. राम सुरासे हा तरुण मेहनती शिक्षक धारवाडी नामक आदिवासी वस्तीत शिक्षण पोचवणारा दूतकसा बनतो, त्याची ही प्रेरक कहाणी आहे! आता हे काही एकाएकी उभे राहिलेले काम नाहीये. सततचे प्रयत्न यापाठी आहेत. यातूनच सारे काही कोसळले नव्हते, याचीच साक्ष पटतेय. सरकारी शाळांतले शिक्षक म्हणजे कामचुकार, पगारापुरते उरलेले, असे जे चित्र रंगवले गेल्याने समाजाने यांना जणू सामाजिक गुन्हेगार ठरवले होते. हे चित्र खरे नाही हे माध्यमे समाजाला सांगत आहेत. ही शिक्षकांना आतून सुखावणारी बाब आहे. त्यातून शिक्षकांची विश्‍वासार्हता वाढत जाईल. परिणामी, सरकारी शाळा आणि मुलं अधिकाधिक समृद्ध होत जातील. त्यासाठी गरज आहे ती सकारात्मक नजरेनं पाहण्याची.

काटेमुंढरीची शाळा

गो. ना. मुनघाटे नावाचा एक शिक्षक जिथं एस. टी. जात नाही अशा दुर्गम, नक्षलग्रस्त खेड्यात प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू होतो. आधीच्या गुरुजींचा खून झाल्याची चर्चा गावाच्या वेशीवरच त्यांच्या कानी पडते. पण मुनघाटे तिथल्या आदिवासींची भाषा, संस्कृती एकूणच समाजजीवनाशी एकरूप होतात. शिक्षक नावाच्या व्यक्तीविषयी येथील लोकांत भयंकर गैरसमज. या सगळ्या काटेरी जीवनाचा अनुभव घेत, प्रतिकूलतेवर मात करीत अध्यापन हा आपला धर्म आहे, अशा व्यवसायनिष्ठेनं हा माणूस काम करीत राहिला. शिक्षण तिथल्या मुलांच्या जीवनाशी जोडण्यासाठी धडपडत राहिला. मुलांकडच्या सांस्कृतिक भांडवलाला औपचारिक गोष्टींची जोड देत मोठय़ा हिमतीनं गावतलं शिक्षणाचं चित्र बदलून दाखवलं.
मुनघाटे यांनी स्वत: ही कादंबरी लिहून वाडीवस्तीवर काम करताना शिक्षकांना काय पद्धतीचे अनुभव घ्यावे लागतात, याचा पट वाचकांसमोर मांडलाय. ही कथा आज महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यात वाड्या-पाड्यांवर काम करणार्‍या कितीतरी शिक्षकांची प्रातिनिधिक कथा आहे. प्रामाणिक प्रयत्न करूनही टीकेचे आसूड ओढले गेल्यानं व्यथित झालेल्या आणि हेच फळ काय मम तपालाअशी अस्वस्थता आणि निराशा आलेल्या बिनचेहर्‍याच्या हजारो शिलेदारांना ही कथा शब्दबद्ध करीत मुनघाटे यांनी मोठेच बळ दिले आहे.


No comments:

Post a Comment