वाचन कट्टा

Saturday, September 12, 2015

पाठीवरचे जड झाले ओझे!

भाऊसाहेब चासकर 


मुलांच्या पाठीवरील ओझ्याबाबत उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आणि हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. दप्तरातल्या गोष्टींमुळे मुलांचे शिकणे’ होते  मग त्याला ओझे का म्हणायचे असा प्रश्न काहीजण विचारतील. ओझे तसे व्यक्तीसापेक्षही असते. शहरी आणि ग्रामीण भागातल्या दप्तरात फरक असला तरी त्याचा आकार आणि भार वाहायला लागणे हे कॉमन आहे.

काय असते दप्तरात?
सहा मुख्य विषयांची पाठ्यपुस्तके व वर्गपाठ-गृहपाठाच्या प्रत्येकी २००-२०० पानी वह्या, निबंधवह्या, वर्कबुक्स, जेवणाचा डब्बा पाण्याची बाटली, कंपासपेटी, रंगपेट्या याबरोबरच गोट्याखडेचेंडू, खेळणी अशाही गोष्टी दप्तरात घेऊन मुलं शाळेत येतात. शाळा भरण्याआधी किंवा सुटल्यावर खेळाचा सराव किंवा इतर क्लास असल्यास त्याचे निराळे ड्रेस आणि साहित्यही दप्तरात असते. या गोष्टींची उपयुक्तता तपासणे किंवा ओझे वाहण्याला पर्याय शोधणे याची गरज ना पालकांना वाटते, ना शिक्षकांना. पालकच मुलांना अनावश्यक भरताड देतात असे शिक्षकांनी म्हणयचे, शिक्षक सांगतात ते मुले नेतात असे पालकांनी म्हणायचे, आणि या दोघांच्या अलिप्ततेचे ओझे मुलांनी विनातक्रार वाहायचे अशी स्थिती सगळीकडे आहे.

शहरांत शाळा लांबवर असतात. स्टेशन-बसस्टॉपपर्यंत दप्तराचे ओझे वाहताना मुलांचा पिट्टा पडतो. ती केविलवाणी होऊन जाताहेत. ग्रामीण भागात तुलनेने पाठीवरचे ओझे कमी असले तरी आजही अनवाणी काही मैलांची पायपीट बिचाऱ्या मुलांना करावी लागतेय. सध्या सगळीकडे सॅकची फॅशन आलीय. त्यांचे ओझे ज्या तऱ्हेने पाठीवर लादले जातेय, त्यातून कोवळ्या वयातल्या मुलांच्या पाठीचा कणा,  हाडे मान, स्नायू यांवर आणि एकूणच शरीराच्या वाढीवर अत्यंत गंभीर परिणाम संभवतात. आपल्या देशात याचा शास्रशुद्ध अभ्यास झाल्याचे दिसत नाही. पाश्चात्य देशांतले अभ्यास वाचताना आपली मुलं किती सोशिक आहेत हे कळते. ज्या शाळांना दप्तर मुलांपेक्षाही जास्त लाडकेअसते, तेथे ते दप्तर शाळांच्या बेंचेसमध्येही मावत नाही! मग दप्तर शेजारी घेऊन मुलांना दिवसभर अवघडल्यासारखे बसावे लागते. कंबरदुखी, पाठदुखी सुरू होते.


ओझे वाढते कसे
याची मुळं कुठेतरी शिक्षण पद्धतीत आणि बाजारूपणात आहेत. शिक्षण हक्क कायद्यामुळे रचनावादी शिक्षणपद्धती आली. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन(CCE) आले. घोकंपट्टीवर बेतलेल्या पारंपारिक’ परीक्षांचे अवाजवी महत्त्व कमी होईल असे वाटले होते. ते अभ्यासक्रमात कमी होत आहे आणि प्रत्यक्षात मुलांच्या जीवनात मात्र वाढत आहे. वास्तव काय आहे?

परीक्षांच्या तयारीसाठी घरचा अभ्यास -

जगाच्या स्पर्धेत टिकायचे तर मुलांना स्पर्धापरीक्षांची सवय हवी. त्यात यशस्वी व्हायचं तर त्या पद्धतीच्या लिखाणाचा भरपूर सराव हवा. त्यासाठी घरचा अभ्यास करून घ्यायला हवा. हे पालकांच्या मनावर पक्के बिंबलेय.(किंवा खासगी परीक्षासंस्थांनी व प्रकाशकांनी तरी बिंबवलेय!) बरंपरीक्षा कशाची तर केवळ स्मरणावर आधारित लिखाणाची! त्यामुळे करून पाहण्यापेक्षा, समजून घेऊन वाचण्यापेक्षा लिहिण्यालाच जास्त महत्त्व दिले जातेय. अशा परीक्षा घेणाऱ्या संस्थांचे आणि खाजगी पुस्तकांचे पेव फुटले आहे. तसेच मुलांना परीक्षपटू म्हणून तयार करण्याच्या भावनेतून घरच्या अभ्यासाचे महत्त्ववाढले. ही सतराशे साठ वह्या-पुस्तके पालक शिक्षकांच्या डोळ्यांना सुखावतात! मुलांवरचे ओझे मात्र वाढत जाते. मुलांचा शिकण्यातला आनंद हिरावून घेणारी ही बाब आहे.

भरपूर घरचा अभ्यास द्याया पालकांच्या आग्रहाला शाळा आणि शिक्षक बळी पडतात. याविषयी ते कोणतीच स्पष्ट भूमिका घेत नाहीत. पटसंख्येत घट होण्याची भीती त्यांच्या मनात असते.

पुन्हा पुन्हा लिहिणे म्हणजे शिक्षण हा गैरसमज
वर्गात एखादा पाठ शिकल्यावर तोंडी प्रश्न वर्गात विचारले जातात. पाठाखालील प्रश्नोत्तरे घरून लिहून आणायला  सांगितली जातात. पुन्हा गृहपाठाच्या वहीतही सेम टू सेम कॉपी करायचे..! ते एक रुटीन वर्क होऊन जाते. नवे काही शिकायला मिळत नसल्याने अभ्यासातला आनंदच मावळत जातो. संख्या कशा बनतात, याचा गंधही नसलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांतल्या विद्यार्थ्यांना रोज १ ते १०० लिहायला सांगितले जाते! समजत नसताना सक्तीने लिहायला लावणे म्हणजे मुलांचा छळ आहे. शिक्षक शिकवताना कळत नाही हे पण एक ओझेच असते!
शाळेतून आल्यावर खेळण्या-कुदण्याऐवजी मुलं वह्या-पुस्तके घेऊन खाली माना घालून खर्डेघाशी करत बसतात तेव्हा पालकांच्या चेहऱ्यावर केवढे समाधान विलसत असते! घटक समजो न समजो लिहीत बसणे, पाने रंगवणे म्हणजे अभ्यास. वह्या न विसरता शाळेत आणणे, तपासून घेणे, असे सारे इमानेइतबारे सुरू असते. अशा प्रकारचा अभ्यास जी शाळा जास्त करून घेते ती चांगली शाळा असा पालकांचा ठाम समज असतो. मुलांचं उमलणं, फुलणं, शिकणं हे खरं तर फार व्यापक असतं. वाचन-लिखाणाचा अभ्यास हा त्यातला एक फार लहान भाग असतो. पण त्याचंच फार मोठं ओझं मुलांवर टाकलं जातंय. म्हणूनच ओझ्याकडे केवळ किलोग्रॅमच्या भाषेत बघता येत नाही. पाठीवरच्या ओझ्यासोबत मनावरच्या ओझ्याबाबत बोलावेच लागते. अशी निरर्थक ओझी वाहात तयार झालेली मुलं भविष्यात समस्यांचे निराकरण करु शकतीलच याची हमी देता येत नाही. कालांतराने या अशा मुलांचं देशाला ओझे होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या सगळ्यात शिक्षणशास्त्र धाब्यावर बसवले जातेय.  रचनावादी तत्त्वही नापास होतेय. धुरीणांनी याकडे अधिक गंभीरपणे पाहायला हवे.

काय करता येईल?
·         मुलं, शिक्षक, पालक यांना जोडणारा पाठ्यपुस्तकसदृश सामाईक धागा असणे चांगलेच. पण सर्व मुलांनी रोज सर्व विषयांची पुस्तके आणायलाच पाहिजेत का? याचा विचार करून पाठ्यपुस्तकांच्या जोखडातून शिक्षण सोडवायला हवे. एका बेंचवर बसलेले दोन विद्यार्थी विषयांची पुस्तके दोघांत सहज शेअर करु शकतील. त्यातून सहकार्याची भावना वाढीस लागेल. जिल्हा परिषदेच्या काही शाळा दप्तरमुक्त झाल्यात. माध्यमिक शाळांतही हे शक्य आहे. कडाप्प्याच्या रॅक बनवून तेथे पुस्तके, वह्या, दप्तरं ठेवता येतील.
·         मोठमोठ्या 200 पानी वह्यांऐवजी लहान आकाराच्या 100 पानी वह्या वापरता येतील. त्याही प्रत्येक विषयाला एकच.
·         घरच्या अभ्यासात फारसे लिखाण न देता, मुलांच्या ठायी असलेल्या ऊर्जेला सकारात्मक वळण देणारे, छंद जोपासनेला, सर्जनशीलतेलाकल्पकतेलानिरीक्षण शक्तीला, विश्लेषक वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या प्रयोगशील गोष्टी द्याव्यात.
·         पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय शाळेत करावी. त्याने किलोभराचे ओझे कमी होईल.
·         प्राथमिक स्तरावर परिसर अभ्याससारखे विषय आता एकात्मिक पद्धतीने शिकवायला घेतले आहेत. बालभारतीची पुस्तके बदलत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. चित्रमयता आणणे, मोठ्या टाईपमध्ये लिहिणे, सुटा मजकूर देणे, हे बदल करताना पुस्तकांचाही आकार मोठा होतोय. चौथीच्या विज्ञानाच्या पुस्तकाकडे उदाहरण म्हणून पाहता येईल. काही विषयांची पुस्तके दोन भागात (भाग १, भाग २) बनवायलाही हरकत नाही.
·         लिहिण्यावरचा फोकसदेखील बदलायला हवा. यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सुटी असली की भरपूर अभ्यास द्याअसे म्हणत मुलांच्या उत्साहावर विरजण टाकणारी मानसिकता बदलावी लागेल, यात मुलांचे सौख्य सामावलेले नाही. 

भाऊसाहेब चासकर
लेखक अॅक्टीव टिचर्स फोरमचे संयोजक आहेत.
email- bhauchaskar@gmail.com

No comments:

Post a Comment