वाचन कट्टा

Saturday, September 12, 2015

प्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच!

- भाऊसाहेब चासकर 

       मुल ज्या सहजतेनं कुटुंबात भाषा शिकते, ती वापरते, त्यात व्यवहार करते, तितक्या नैसर्गिक पद्धतीनं, सहजतेनं मूलं शाळांमधूनही भाषा शिकली पाहिजेत अशी अपेक्षा असते. मग खरोखरच वर्गातून मुलं इतक्या सहज पद्धतीनं भाषा शिकताहेत का? तर अर्थातच याचं उत्तर 'नाही' असं येत. खरे तर प्रत्यक्ष शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच मुलांनी आपल्या भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविलेले असते. याच भाषेद्वारे मुले स्वत:चे विचार, भावना इतर लोकांपर्यंत पोहोचवित असतात. मग तरीही अपेक्षेप्रमाणे का घडत नाही? त्यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत? तर त्याचे एक महत्त्वाचे उत्तर मिळाले ते असे की, प्रमाण भाषेत शिकण्याचा आणि शिकविण्याचा अतिरेकी आग्रह. भाषा बदलत असते. हे अगदी मान्य. पण हे खरे असले तरी पण पाठ्यपुस्तकातले मराठी शिकण्याच्या आग्रहाने खेड्या-पाड्यांतले जिवंत, रसरशीतपणा असलेले मराठी आपण संपवले आहे. याचा विचार करायला फुरसत आहे कोणाला?
       भाषा ग्रहणाची जशी एक जैविक व मानसिक बाजू असते तशीच ती सामाजिक असते. भाषाविज्ञानात काम करणा-या तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, ‘सामाजिक गरज नसती तर मानवाने भाषा शिक्षणाचा प्रयत्नच केला नसता.भाषाशास्त्रज्ञ विल्यम हल याने टोकाचे मत मांडलेय तो म्हणतो की, 'जर आपण मुलांना बोलायाला शिकवले असते तर ते कधीच शिकले नसते' आपले काम साधून घेण्याच्या गरजेतून मूल परिसरात बोलल्या जाणा-या भाषेत व्यवहार करीत शिकत जाते. कोणाशी कसे बोलाचे, कोणाला बरोबरीने वागवायचे, कोणाशी आदरार्थी बोलायचे याचे ज्ञान मुलाला अनुभवातूनच मिळत असते. आज्ञा करताना कसे बोलायचे, हट्ट धरताना कसे बोलायचे, लाडीगोडी लावताना कसे बोलायचे हे सर्व मुले उत्स्फूर्तपणे शिकत असतात. ऐकणेबोलणे, आंतरक्रियांमधून मुलांची भाषिक प्रगती होत असते. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर शाळेत येण्यापूर्वीच मुलांचे भाषाशिक्षण विशिष्ट एका टप्प्यावर येवून पोहोचलेले असते. आपण मात्र जॉन लॉकने म्हटल्याप्रमाणे 'मुलं म्हणजे कोरी पाटी' हेच घट्ट धरून बसलोत.
       आपल्या देशात अनेक प्रकारच्या विविधता आहेत. त्यात भाषेबाबत तर खूपच वैविध्य आहे. त्याला कधी सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ असतात, तर कधी ऐतिहासिक, भौगोलिक कारणे असतात. त्याला एकूणच समाजाच्या वाटचालीवर बरा-वाईट परिणाम होत असतो. भाषाशिक्षणापुरता (म्हणजे प्रथम भाषेपुरताच) मर्यादित विचार करायचा झालं तर नेमकी गडबड कोठे होते, ते आपल्या लक्षात येईल. तर मुद्दा असा की, भाषा ही परंपरेने एका पिढीकडून दुस-या पिढीकडे दिली जाते. भाषा कशी वापरायची, याचे रितीरिवाजदेखील समाजाकडून मिळत असतात. जर का भाषा अभिव्यक्तीचे, संवादाचे माध्यम असेल आणि ती अभिव्यक्ती प्रत्येक मूल स्वत:च्या भाषेत नैसर्गिक रीतीने नीटपणाने करू शकत असेल, तर मग आपण प्रमाणभाषेचा उगीच आग्रह कशासाठी धरतो आहोत? हा खरा प्रश्न आहे. मुले शाळेत येताना आपली बोली’ (घरची भाषा) घेऊन येतात, पण त्यांना शिक्षण घ्यायचे असते ते प्रमाण भाषेत! पहिल्या इयत्तेत येईपर्यंत मूल एका विशिष्ट कौटुंबिक वातावरणात वाढत असते. त्याच्या घरच्या भाषेत त्याचे सारे व्यवहार व्यवस्थितपणे सुरु असतात. म्हणजे भूक लागली, की मागितल्यावर जेवण मिळते. तहान लागली की पाणी. जेव्हा मुलाला बोलता येत नसते तेव्हाही मुल भ्षेचा वापर करते. म्हणजे आई आवरून-सावरून घराबाहेर जायला निघाल्यावर आईसोबत जायचे असेल तर मुल भोकाड पसरते म्हणजे मागे लागते... म्हणजे त्याच्या आवश्यकतेनुसार सोयीने स्वत:ची भाषा वापरते, असे सगळे तिकडे सुरु असते.
       कोणत्याही मुलाच्या भाषाशिक्षणास अगदी लहान वयात म्हणजे काही दिवसांतच सुरुवात झालेली असते. आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे शिकण्याच्या एकूणच प्रक्रियेत भाषेचे स्थान मध्यवर्ती असते. लेव्ह वायगोटस्की हा रशियन भाषाशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ होता. त्याच्या तत्वज्ञानात असे म्हटलेय की, मुल शिकण्याचा आशय जरी अनुभवातून उचलत असले तरी त्याचा अर्थ लावण्याचे काम भाषेकरवीच करीत असते. आपण शिकतो तेव्हा शिकलेल्या भागावर विचार करणे असूद्यात किंवा विविध विषयांचे आकलन असूद्यात ते भाषेकरवीच करीत असतो. 'मुलांच्या विकासावर सामाजिक वातावरणाचा मोठा परिणाम होत असतो. बालकाच्या विचार विकासात भाषेला अनिवार्य असे स्थान आहे. भाषा हेच विचार करण्याचेही साधन आहे' अशी मांडणी वायगोटस्कीने केली. केवळ भाषा नव्हे तर स्वभाषा, माणसाने पआत्मसात केलेली पहिली भाषा हेच माणसाचे प्रभावी मानस साधन (Mental tool) असते. पहिल्या भाषेतून व्यवहार करणे, इतर लोकांशी संवाद साधने, विचार करणे आणि शिकणे ही एक सहज प्रक्रिया असते.
       मग जर का भाषाशास्राची ही महत्वाची बाजू आहे, आणि अनौपचारिकपणे जगण्यात प्रमाणभाषेवाचून कोणाचे काहीच अडत नाही. उलट त्यांना स्वतःचे म्हणणे स्वतःच्या भाषेतून अधिक प्रभावीपणे मांडता येते. ग्रामीण मराठीमधील काही वाक्ये पहा- १. लई मज्जा केली २. जत्रेत मोक्कार फिरलो. ३. लई भारी पिच्चर व्हता रे. ४. मपली माय बाजाराला गेल्ती... भाजीऐवजी कोरड्यास किंवा कालवण, माझ्या-तुझ्याऐवजी माह्या-तुह्या. असे अनेक शब्द आजही ग्रामीण भागात सर्रास वापरले जातात. किंबहुना आईपेक्षा माय हा शब्द अधिक माया घेऊन येतो. जवळकीच्या नात्याची साक्ष देतो. त्याला एक आपलेपणाच्या ओलाव्याची शेड’(shade) असते. शाळेतल्या पुस्तकात त्यांना हे शब्द कुठेच भेटत नाहीत. मग अशा मुलांना न्यूनगंड छळायला लागतो. याला कारण म्हणजे शाळेत पाय ठेवल्यापासून प्रमाणभाषेचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसते. आधीच शाळा, खोल्या, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळेतील मुले हे सारे त्या मुलांच्या दृष्टीने नवे, वेगळे जग असते. आजवर दिवसभर मोकळ्या वातावरणात मस्त हुंदडणा-या मुलांना हे जग समजून घेणे आधीच जड जाते. आधीच या औपचारिक रीतीने शिकताना पाठ्यपुस्तके किंवा शाळेतल्या शिक्षणातून मुलांचे हे जगणे पूर्णपणाने हरवलेले असते. मुलांचे सांस्कृतिक भांडवल आणि शिकणे याचा मेळ आपण कुठे घातलेला नाही!
       प्रमाणभाषेच्या अडथळ्यामुळे स्वत:च्या भाषेतून साकारणारे त्याचे विश्व आणि शाळेत जे सुरू असते, त्याचा सांधा कुठे जुळत नाही. ब-याचदा असा विचित्र अनुभव येतो की मुलांना निबंधलेखानासाठी ग्रामीण जीवनावरचे विषय दिले जातात. परंतु त्या निबंधाला ग्रामीणतेचा अजिबातही वास येत नाही. पाठ्यपुस्तकी भाषेत लिहिण्याच्या संस्कारामुळे मुले नीट व्यक्त होवू शकत नाहीत. म्हणूनच मग त्यांचे जगणे, बोलणे, निरीक्षणं, लकबी, भाषा हे कुठेच आढळत नाही. मग स्वत:ची आई लिहिण्यापेक्षा मुलं सोप्पा पर्याय निवडतात. रेडीमेड निबंध लिहून काढतात. मग होते असे की, ‘नवनीतची आई सा-यांचीच  आई होते! आपण लेखन शिकवतो ना? मग मुले लिहूका शकत नाहीत? मुले आपले मनातले विचार कागदावर उतरून काढू शकत नाही कारण की, आपल्या भाषेला प्रतिष्ठा नाही हे ग्रामीण,आदिवासी मुलांच्या मनावर बिंबविण्यात सध्याच्या व्यवस्थेला पुरेपूर यश आलेय! दुसरीकडे प्रमाणभाषा त्यांना जवळची वाटत नाही. तिच्याविषयी असेल तर त्यांच्या मनात भीतीच आहे. आणि ती आपण म्हणजे व्यवस्थेने घुसवलीय.
       इंग्रज येण्यापूर्वी शहरवासियांची मुळे गावाच्या मातीत खोलवर रुतलेली असत. शहरी भाषेला खेड्यातल्या मातीचा ताजा वास असे. म्हणजे मुंबईत वेगवेगळ्या भागातून चाकरमाने आले, पण त्यांची भाषा त्यांनी सोडली नाही. म्हणूनच मग मालवणी, घाटी असे किती तरी लोक पटकन ओळखू येत. पण पुढच्या काळात आपण मातृभषा नाकारून इंग्रजीचे महत्त्व इतके वाढविलेय की, विचारायलाच नको. पुस्तकातली प्रतिज्ञा म्हणताना तेवढे आपण विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा आदर करतो. पण आजही आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे कामकाज केवळ इंग्लीशमधुनच चालते. संसदेतही हिंदी-इंग्लीशमध्येच बोलावे लागते. युनायटेड नेशनमध्ये जर सर्व भाषात कामकाज चालते. पण दहा कोटी लोक मराठी बोलतात आणि जगभरातला पहिल्या विसातला भाषिक समूह असूनही तिची दखल येथे कोणी घेत नाही. (तेच तेलगु, तमिळ, मल्याळीचेही.) आजवर या गोष्टीमुळे कित्येक बोली मेल्या. आणखीन काही रोज मरताहेत. मातृभाषा असलेल्या मराठीपुढे आता अस्तित्वाचे आव्हान उभे ठाकलेय. अलीकडे तर मराठी तरुण पिढी मोठ्या प्रमाणवर टेक्नोसॅव्ही होताना दिसतेय. थेट इंग्लिशमधून त्यांचा पत्रव्यवहार सुरु असतो. बोलण्यातही दर वाक्यात इंग्लिश शब्द येतो म्हणजे येतोच. माहिती तंत्रज्ञानामुळे त्यामागून येणा-या 'डीजिटल सोसायटी'मुळे जर का मराठी संगणकातून हद्दपार झाली, तर पुढच्या काळात मराठी नेमकी कुठे असेल? असा प्रश्न पडतो. मराठीच्या नावाने केवळ गळे काढून हाताला काय लागणार आहे? ते खरेच कळत नाहीये.
       अजून एक गोष्ट. भाषा शिक्षणाचे मुळात उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक समायोजन आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास. आपल्याकडे प्रमाणभाषा शिकविली जाते, ती बोलीभाषेला पर्याय म्हणून किंवा तिची जागा घेण्याच्या हेतूने, तीदेखील एका सुरात, एका लयीत, एका तालात! वर्गाबाहेरच्या भाषिक विविधतेचा काडीचाही विचार न करता. अत्यंत निरस आणि रुक्ष पद्धतीने. याचा मुलांना केवढा त्रास होतो. ब्राह्मणीकरणाची मोठी छाप पाठ्यपुस्कांवर दिसून येत असल्याने अर्थातच ग्रामीण, दलित, आदिवासी मुलांसाठी शिकणे आव्हानात्मक होवून बसते. आणि मुख्य म्हणजे शिक्षणाच्या उंबरठ्यावरून पाउल आत टाकतानाच बिचाऱ्या मुलांना तो आघात सहन करावा लागतो, हे सर्वात वाईट. देशपातळीवरील काही संशोधानातुनही हा मुद्दा पुढे आला आहे. हजारो लोक बोलतात, ती शिक्षणाची भाषा का ठरू शकत नाही? उदाहरणार्थ, आसाम राज्यात राजवंशी भाषा बोलणारे हजारो लोक आहे पण या भाषेतून शिक्षण देणारी एकही शाळा उघडलेली नाही. इतक्या लांब जाण्याची गरजच नाही- आपल्या राज्यात कोकणा, भिली, पावरा, गोंडी, माडिया या भाषांचा प्रमाण मराठीशी काय संबंध आहे? सांगा ना. केवळ महाराष्ट्रात राहतात म्हणून त्यांचीही मातृभाषामराठी? आणि मातृभाषा म्हणजे आई ज्या भाषेत बोलते ती भाषा असा अर्थ आपण लावतच नाही.
       जगभरात सुमारे ५००० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात, तर ७०० पेक्षा जास्त भिन्न सांस्कृतिक समूह आहेत. भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशात तर मोठ्या प्रमाणावर बहुभाषिकता आढळून येते. १९६१ च्या पाहणीनुसार भारतात १६५२ भाषा नोंदवल्या आहेत. (अलीकडची आकडेवारी मिळू शकली नाही.) आपल्या महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तर केवळ आदिवासींमध्ये ७४ प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, असे संशोधन आदिवासी संस्कृतीचे संशोधक गोविंद गारे यांनी केले आहे. जर १० मैलांवर भाषा बदलते, असे केवळ म्हटले जाते. एकट्या महाराष्ट्रात तब्बल २५० प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. आणि हो, या भाषांना बोलीअसे हटकून संबोधले जाते. शाळेत येणारी मुले आणि न येणारी मुले यांचे संवाद पुस्तकात दिले जातात. त्यातून 'त्यांच्या' हिनविण्याचे प्रकार सुरु असतात. त्यामागेही भाषेचे राजकारण असते. कारण की भाषा एक सत्ता असते. जिथे तिथे सत्तेच्या भाषेलाच प्रतिष्ठा मिळत राहते. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा असा भेदाभेद मुद्दामहून केला जातो. प्रमाणभाषा म्हणून मानलेली मराठी ही प्रमाणभाषा नसून एक बोलीच आहे. हे कसे विसरता येईल?
         राजकीय-सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या आणि एकोणिसाव्या शतकापासून शिक्षणात पुढारलेल्या आणि सांस्कृतिक प्रतिष्ठा असणाऱ्या पुणे व मुंबई येथील विशिष्ट वर्गाची भाषा हळूहळू प्रमाण मराठी बनली. त्यातून ब्राह्मणी-ब्राह्मणेतर असा भेद मराठी भाषेत अगदीच स्पष्टपणाने दिसून येतो. प्राचीन काळापासून शिक्षणाची मक्तेदारी असल्यामुळे आणि त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक वर्चस्वामुळे ब्राह्मणी बोलीमराठी प्रमाणभाषा बनली. पुढे शिक्षणातील माध्यम आणि साहित्यातील वापर यामुळे स्थिरावली. वास्तविक प्रमाणभाषा ही पूर्णपणे कृत्रीम असते. ती मुद्दामहून शिकावी लागते. आणि आणखीन एक भाषेत असे प्रमाण वैगरे काही नसते असे भाषातज्ज्ञ सांगतात. मराठीचे जे वेगवेगळे प्रकार बोलले जातात, त्यांना वेगवेगळे पैलू आहेत, शैलीचा नैसर्गिक विशेष आहे. परंतु त्या भाषा नव्हे तर बोली आहेत, अशी हेटाळणी केली जाते. बोलीभाषा ह्या अशुद्ध, त्या केवळ गांवढळ, अडाणी लोकांनीच बोलायच्या असतात. अशी प्रस्थापित व्यवस्थेच्या मनात अढी दिसते. (महात्मा फुलेंच्या भाषेला हिनवण्याचे उद्योग त्याही काळात झाले होते!)
      तात्पर्य, या भेदभावामुळे वास्तव जीवनीतील भाषाविविधतेचा विचार न करता प्रमाणभाषा माथी मारल्यामुळे दलित, ग्रामीण, आदिवासी मुले शिक्षणात मागे पडताना दिसतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे चांगली बौद्धिक क्षमता व कुवत असतानादेखील केवळ भाषाविषयक दुराग्रहामुळे हे सारे घडते आहे, अमुक एक भाषा शुद्ध आणि अमुक एक भाषा अशुद्ध असे काही नसते, असे भाषाविज्ञानाचे अभ्यासक सांगतात. त्याचे कारण म्हणजे व्याकरणिक संकल्पना या भाषेच्या आधी नसतात, त्या मागून भाषेवर लादल्या जातात. व्याकरणाच्या आणि प्रमाण भाषेचा आग्रह धरणाऱ्या आणि त्याचा बागुलबुवा करणाऱ्या मंडळीना हे जर का लवकर समजले, उमजले तर तो आदिवासी-दलित मुलांच्या दृष्टीने सर्वाधिक आनंदाचा दिवस असेल. परंतु एकूणच यासाठी अधिकाधिक व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे. सर्वात आधी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५नुसार शिक्षण मुलांच्या जीवनाची जोडताना त्याचे संदर्भीकरण करण्याची तातडीची गरज आहे. पाठ्यपुस्तकांचे अध्यापन म्हणजे भाषेचे आणि व्याकरणाचे अध्यापन हा गैरसमज भाषाशिक्षणातील सर्वात मोठा अडसर आहे, या पारंपरिक गैरसमजूतीला छेद दिला पाहिजे.
      मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा रास्त आग्रह धरला जातो. परंतु येथे मातृभाषेची सुस्पष्ट व्याख्या केली पाहिजे. मूल ग्रहणकाळात आत्मसात करते ती मातृभाषा मानली तर ती बहुधा बोलीच्या स्वरुपात असते. तांत्रिक गोष्टींचा बाऊ करून आज बोलीमध्ये किंवा त्याच्या भाषेच्या प्रकारात (काही इयत्तांपर्यंत का होईना) शिक्षण देण्याचे व्यवस्थेने सोयीस्कररीत्या नाकारले आहे. अर्थातच एक काही तरी व्यवस्था म्हणून किंवा सोय म्हणून प्रमाण म्हणा किंवा व्यवहाराची भाषा असे काही असुद्या हो. पण शाळेत पहिल्या दिवशी पाय ठेवणाऱ्या लेकरांकडून अशी अपेक्षा करणे म्हणजे त्याला काही अर्थच नाही.  किमान शिक्षणाची सुरुवात करताना तरी बोलीआणि प्रमाणभाषा अशा दोन्हींचाही अवलंब केल्यास त्यात विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचेही हित आहे. त्यातून मुलांचे शिक्षण अधिक आनंददायी होईल. भाषा जोडणारी असावी, शिक्षणापासून तोडणारी नको. मुलांच्या भाषेचा आदर केल्यास शिक्षण त्यांच्या जीवनाशी जोडले जाईल. त्यांच्या अनुभवविश्वाशी नाते सांगू लागेल. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक विविधता असलेली मुले प्रमाणभाषेच्या आग्रहामुळे कायम न्युनगंडाने पछाडलेली दिसतात. कायमच दडपणाखाली राहतात. शाळेने म्हणजे एकूणच व्यवस्थेने मुलांची भाषा समजून घेतल्यास मूलं शाळेपासून दूर जाणार नाही. ती शाळेत येतील, रमतील, टिकतील, शिकतील, पुढे जातील. ती संधी आपण मुलांना व्यवस्था म्हणून उपलब्ध करून दिली पाहिजे, किंबुहना ती आपली जबाबदारीच आहे. आज जे काही भषा शिकविणे म्हणजे व्याकरण शिकविणे हे सारे सुरु आहे ते मुलांना नावूमेद करणारे वाटतेय. प्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह मुलांच्या शिक्षणातील महत्त्वाचा अडसर ठरतो आहे.
          आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात आणून द्यायचा हा की, आपल्याकडील पुरुषी वर्चस्वाच्या समाजाचे प्रतिबिंब भाषेतही पडल्याचे दिसते. राष्ट्रपुरुष, समाजपुरुष, राष्ट्रपिता यांसारखे शब्द पुरुषप्रधानता अधोरेखित करतात. राष्ट्रपतीसारखा शब्द तर पुरुषवाचक आहेच, परंतु एखादी स्री राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यानंतरही त्यात कोणताही बदल न करता हा शब्द तसाच वापरला जातो. गुरुजी, डॉक्टर, शास्रज्ञ, दुकानदार, वकील हे आणखी काही पुरुषवाचक शब्द सांगता येतील. माणसाची वृत्ती त्याच्या भाषेत प्रतिबिंबित होते, याची ही वानगीदखल काही उदाहरणे दिली. अजूनही बऱ्याच गोष्टी सांगता येतील पुरुषी वर्चस्व असलेली भाषा अशी इंग्रजी भाषेवर जोरदार टीका झाल्याने अलीकडच्या काळात इंग्रजीत काही बदल करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, लग्नावरून स्रीला Mrविवाहित(mrs.) आणि Missअविवाहित(miss) असे शब्द वापरण्याऐवजी श्रीमती Ms(ms) असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. असे प्रयत्न मराठी भाषेत झाल्यास लिंग समभावाच्या दृष्टीने त्याची चांगली मदत होऊ शकेल. मग आपल्या प्रतिज्ञेमधील सारे भारतीय माझे बांधव आहेत.असे पुरुषवाचक उल्लेख वगळण्यापासून पाठ्यपुस्तकांतील अभिजन वर्गाच्या भाषेची छाप पुसून, आशयामधील सुधारणेला मोठा वाव आहे. शिक्षण मुलांच्या जीवनाशी जोडा, असे खूप बोलले जाते. तसे ते खरोखरच जोडायचे असेल तर त्याची सुरुवात भाषेपासून करायला हवी.

बहिरवाडी शाळेतील काही प्रयोग
      अकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या आदिवासी बहुल खेडेगावातल्या प्राथमिक शाळेत मी शिकवितो. आम्ही शिक्षकांनी मुलांच्या भाषेचे वेगवेगळे प्रकार काही प्रमणात शिकून घेतले. शाळेत आल्यानंतर मुलांशी त्यांच्या भाषेत बोलू लागले. त्यातून मुलांच्या मनातील शिक्षकांविषयीची, शाळेविषयीची भीती काही प्रमाणात कमी झाली. त्यांना आपलेपणा वाटू लागला. हे झाले बोलण्याच्या पातळीवर. त्यांना त्यांच्या भाषेत नैसर्गिकपणे व्यक्त होता यावे यासाठी आमची बाराखडीया वार्षिक हस्तलिखितामध्ये एक  थीम निवडून मुलांना त्यांच्या अनुभाविश्वातल्या विषयांवर लिहिते करत गेलो. अर्थातच यासाठी प्रमाणभाषेचा आग्रह नव्हता. तुमच्या भाषेत, शब्दांत व्यक्त व्हा असे आवाहन मुलांना केले. आदिवासी समाजातील मुले ठाकरी भाषेत, भटक्या विमुक्त जमातीतील मुले वडारी भाषेत, मराठा मुले त्यांच्या ग्रामीण ढंगातल्या बोलीत लिहिती झाली. मोठी माणसे आई-वडील, नातेवाईक यांची मदत घेण्याची मुभा असते. यास आश्चर्यकारक प्रतिसाद मिळाला. दुसरी ते पाचवीच्या ज्या मुलांना एखाद्या विषयावर प्रमाणभाषेत निबंध लिहायला सांगितल्यावर पाच-दहा वाक्यांत त्यांचे भांडवल संपते, त्या मुलांनी त्यांच्या आवडीच्या विषयावर लिहायला सांगितल्यावर भरभरून लिहिले. माझे विश्वयावर कोणी आपल्या बहिणीच्या लग्नाविषयी लिहिताना कुटुंबाची आर्थिक स्थिती वर्णन केली, कोणी सांस्कृतिक परंपरांच्या नोंदी घेतल्या होत्या. तर कोणी गाव परिसराचे निराळेपण अधोरेखित केले होते. सांग मा पाखरा मारीत न्हाई, झाडा तोडीत न्हाईअसे लिहिणाऱ्या सागर खडके या आदिवासी मुलातील बदल त्याला पर्यावरणाबाबत आलेले भान सांगून गेला.

      ‘माझे शिवारया विषयावरील दुसऱ्या वार्षिकांकात मुलांनी शिवारशी असलेले भावनिक नाते शब्दबद्ध केले. प्रत्येक मुलाच्या भावविश्वात शिवाराला विशेष स्थान असले तरी लेखनाचा विषय म्हणून मुलांनी शिवाराकडे कधीच पहिले नव्हते. शिवज हा विषय मुलांनीच चर्चेतून निवडला. शिवारावर लिहायचे म्हटल्यावर विद्यार्थ्यांनी नेहमीच्या परिचयाच्या गोष्टींकडे निराळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. गाव-शिवाराबद्दल त्यांचं कुतूहल जागं झालं शिक्षकांनी मुलांसमवेत शिवारफेरी मारली. त्यानंतर कोणी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. कोणी कृषिसेवा केंद्र्चालकांशी संवाद साधला. कोणी तलाठ्याच्या दप्तरातून नोंदींची जंत्री जमवली. कोणी आपल्या शेतकरी बापाविषयीच्या भावनांना शब्दरूप दिलं. त्याला भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालण्याचा जोरकस प्रयत्नही केला. एकूणच यातून परिचयाच्या शिवाराकडे पाहण्याचा नाव दृष्टीकोन मुलांना मिळाला. यासाठी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि स्वातंत्र्य देणं या गोष्टी महत्वाच्या होत्या, त्या शिक्षकांनी केल्या. याशिवाय वर्गातही मुलांची त्यांच्या भाषेतील तोंडी उत्तरं स्वीकारली जातात. लिहितानाही मुलांनी लिहिलेलं उत्तरं बरोबर असेल तर व्याकरणाचा काटेकोरपणा बाजूला ठेवून उत्तरं स्वीकारले जाते.
उदाहरणार्थ, इयत्ता दुसरीच्या वर्गात सामर्थ्यया शब्दाऐवजी सामरथ्यकिंवा प्रसंगऐवजी परसंगअसे शब्द सुरुवातीला स्वीकारून पुढे त्यांना तो शब्द बिनचूक कसा लिहावा हे सांगितले जाते. परंतु मुलांसमोर त्यावर चुकीची फुली मारून मुलांना नाउमेद केले जात नाही. मुळातच आदिवासी मुलं लाजरीबुजरी असतात. अडचणी पटकन सांगत नाहीत. बोलतही नाहीत. हळूहळू मुलांच्या भावविश्वात शिरण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्यांच्या भाषेत व्यक्त होण्यला त्यांना वाव दिल्याने मुलं मोकळेपणाने व्यक्त होऊ शकली. ५-१० ओळींत निबंध संपविणारी मुलं आता पान दीड पान लिहिताहेत. लिहिण्याबाबत आत्मविश्वास वाढीला लागल्याने ही मुलं आता कविता लिहू लागलीत. काही नियतकालिकांतून त्यांचे ‘साहित्य’ प्रसिद्ध होतेय.
      आदिवासी मुलांच्या भावविश्वात निसर्गाला विशेष स्थान असते, त्यातील झाडे, वेली, फुले, पक्षी याबाबत मुलांचे सूक्ष्म निरीक्षण असते. परिसर भेटीसाठी जंगलात घेऊन जातो. स्थानिक माहितगार माणसांच्या मदतीने आधी मुलांना माहिती देत असू. नंतर आदिवासी समाजातील मुलंच बोलती झाली. लाजरेपणा, बुजरेपणा सोडून स्वत:च्या भाषेत माहिती सांगायला पुढे येऊ लागली. भले ते पाठांतर किंवा वर्गातल्या इतर गोष्टींत मागे होती. परंतु या परिसर भेटीदरम्यान ते इतर मुलांना माहिती सांगत पक्ष्यांची, डोंगरांची नवे, झाडे-वेली, त्यांचे औषधी गुणधर्म, वापर हे सांगताना आणि माकडासारखे झाडावर चढून फळं काढताना, कंदमुळं खोदून काढताना शाळेतील हुश्शारमुलंही त्यांच्यामागे फिरू लागली. त्यातून त्यांना आत्मविश्वास मिळाला. आपल्या माहितीला, भाषेला प्रतिष्ठा आहे हे त्यांना सुखावणारे आणि आश्वासक वाटले असावे. त्यामुळे त्यांना शिक्षणात रस वाटू लागला. गोडी वाढली. वरचेवर शाळेला बुट्टी मारणारी मुलं रोज उत्साहाने शाळेत येऊ लागली. कारण शिक्षकांनी शाळा आणि घर यांना जोडणारा पक्का भाषिक पूल बांधला आहे.

भाऊसाहेब चासकर,
बहिरवाडी, अकोले.

No comments:

Post a Comment